खोलीत एकटी मी सापडले पुन्हा एकदा,
विचारांच्या काळ्या गर्तेत अडकले पुन्हा एकदा.
वाटे सभोवताली जणु उंच टेकड्या या,
कोंडून ठेवलेसे वाटे पुन्हा एकदा.
प्रतिबिंब स्वत:चे हे वाटे अनोळखी अन,
श्वास हि मग भासे अपुरा पुन्हा एकदा .
जगण्याची गणिते वेगळी, बदलल्या बेरजा सा-या
बाकी आणि उणे राहीले पुन्हा एकदा.
कुणी भेदून द्या ही भिंत जाउदे पुढे मलाही,
कोप-यातून खुणाविते, वेडे मन पुन्हा एकदा.
उसळून येते सर्व आणि उंचच उंच लाटा,
शांतता मिळे कधी, ही आस पुन्हा एकदा.
काळोखाची वाटे भिती आता,
नको आता शांतता, गडबड करा पुन्हा एकदा.
शब्दांचा किती हा आधार, मिळतो अशा क्षणांना,
सावरता येते मग मला स्वत:ला पुन्हा एकदा.